- बाळेकुंद्री गावातील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
केएसआरटीसी बसचा कंडक्टर मराठीत न बोलल्याच्या रागातून तरुणांच्या एका गटाने त्याला अमानुष मारहाण केली. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री येथे ही घटना घडली. महादेव मल्लाप्पा हुक्केरी (वय ५०) असे मारहाण झालेल्या कंडक्टरचे नाव आहे. त्याचावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत कंडक्टर महादेव हुक्केरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधून एक तरुण आणि तरुणी मध्यवर्ती बस स्थानकातून बाळेकुंद्री खुर्द येथे निघाले होते. यावेळी तरुणीने दोघांचे तिकीट मागितले. यावेळी दुसरा प्रवासी कोण म्हणून कंडक्टरने विचारले असता तरुणीने तरुणाकडे बोट दाखवले. यावेळी कन्नड मधून बोलणाऱ्या कंडक्टरला मराठीत बोला असे तरुणाने सांगितले असता, कंडक्टरने मला मराठी येत नाही, मी कन्नड मधेच बोलणार असे सांगितले. यावर तरुणाने तुला आमचे गाव येऊ दे मग सांगतो असे उत्तर दिले. या दरम्यान बस बाळेकुंद्री खुर्द येथे येताच पन्नास हून अधिक लोकांनी बस रस्त्यात अडवली. नंतर बसमध्ये वीस हून अधिक जणांनी चढून कंडक्टरला मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करण्यास आलेल्या बस चालकाला देखील शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या घटनेबाबत पोलीस उपायुक्त रोहन जगदीश म्हणाले, बसमध्ये प्रवास करत असताना वाहकाने त्यांच्याकडे तिकीट मागितले असता तरुणाने वाहकाला मराठीत बोलण्यास सांगितल्याने शाब्दिक बाचाबाचीला सुरुवात झाली, पुढे याचे मोठ्या वादात पर्यवसान झाले. या दरम्यान बस बाळेकुंद्री गावात जात असताना तरुणांच्या एका गटाने येऊन मारहाण केली. याप्रकरणी मारिहाळ पोलिस स्थानकात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments