- रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ तर्फे आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ तर्फे दि. ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. खानापूर रोड टिळकवाडी बेळगाव येथील मराठा मंदिर कार्यालयात सदर प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
आज मंगळवारी सकाळी १० वा. गोवावेस येथून प्रदर्शनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थी, घोडेस्वार आणि भगवेध्वज घेऊन मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योगपती शिरीष गोगटे, मिलिंद भातकांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष शरद पै, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रम सिंह मोहिते, येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, अशोक नाईक, निलेश पाटील, भूषण मोहिरे रोटरी गव्हर्नर अनंत नाडगौडा, आनंद कुलकर्णी, माजी राज्यपाल वेंकटेश देशपांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले, या भव्य शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मला बोलावण्यात आले याचा मला अभिमान आहे आम्ही इतिहासात वाचलेल्या मात्र प्रत्यक्ष न पाहिलेल्या गोष्टी इथे पाहायला मिळाल्या शिवकालीन असंख्य शस्त्रास्त्रे या ठिकाणी मांडण्यात आली आहेत. मराठ्यांसाठी ही अत्यंतगर्वाची बाब आहे. आम्ही आपला पूर्वापार इतिहास अद्याप जतन करून ठेवला आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील शिवकालीन अनेक सरदार घराण्याचा सहभाग आहे.त्यांच्यासह येथील असंख्य स्वयंसेवकांनी मराठ्यांचा इतिहास अबाधित राखण्याचे जे दायित्व स्वीकारले आहे ती आज येथे पहावयास मिळाले. त्याखेरीज रांगोळी कलाकारांनी रेखाटलेल्या भव्य अशा शिवकालीन रांगोळ्या पाहून नतमस्तक व्हावयास होते. या रांगोळ्या कलाकारांनी ४०-४० तास बसून रेखाटले आहेत हे खरोखरच अभिमानास्पद आहे असे सांगून ब्रिगेडियर मुखर्जी यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.
तर शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवरायांची आणि त्यांच्या शस्त्रांची माहिती देणारे चिंचवड पुणे येथून आलेले चंद्रनील यांनी बेळगावच्या प्रदर्शनाबद्दल माहिती दिली.
दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाहता येणार आहे. त्यामुळे शस्त्रप्रदर्शन बेळगावच्या शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. मराठ्यांच्या शौर्याची व पराक्रमाची गाथा असलेल्या या प्रदर्शनात मराठा आरमार व शिवकालीन रांगोळी अशी सांगड घालण्यात आल्याने डोळ्यांचे पारणे नक्कीच फिटणारं आहे. अधिकाधिक शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments