- चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक
- २०१७ च्या पराभवाचा हिशोब चुकता
- विराट कोहली विजयाचा शिल्पकार
दुबई : टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक दिली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. या पराभवासह पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आले आहे.
पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी २४२ धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान ४ विकेट्स गमावून सहज पूर्ण केले. विराट कोहली हा टीम इंडियाच्या विजयाच्या हिरो ठरला. विराटने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करून आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले. तसेच श्रेयस अय्यरने अर्धशतक करून विराटला उत्कृष्ट साथ दिली. कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार शुबमन गिल, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनीही विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला २४१ धावांवर रोखण्याची कामगिरी करून विजयाचा मार्ग सुकर केला होता.
टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली याने आयसीसी चॅम्पियन्स २०२५ स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विराटने पाकिस्तानविरुद्ध १४ धावा पूर्ण करताच सचिनला मागे टाकले आहे. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये वेगवान १४ हजार धावा पूर्ण करणारा पहिला फंलदाज ठरला. विराटने सचिनच्या तुलनेत ६३ डावांआधी ही कामगिरी करुन दाखवली आहे. तसेच विराट यासह वनडे क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण करणारा एकूण तिसरा आणि टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
0 Comments