सौंदत्ती / वार्ताहर 

सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची भरत पोर्णिमा यात्रा बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. दरम्यान यात्रेपूर्वीच चार दिवस अगोदर यल्लामा डोंगर डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पौर्णिमा यात्रेपूर्वीच लाखो भाविक भरत पौर्णिमा यात्रेसाठी यांना डोंगरावर पोहोचले आहेत.

भरत पौर्णिमा यात्रेसाठी विशेषत: उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून , कर्नाटक, महाराष्ट्र,  गोवा, आंध्रप्रदेश तसेच केरळ येथून तब्बल दहा लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर  श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी येथील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देवस्थान प्राधिकार विकास महामंडळाच्या वतीने भरत पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी प्रचंड गर्दी पाहून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. लाखो भाविकांच्या मानाने प्रशासनाने केलेली तयारी अपुरीच असल्याचे दिसून येत आहे.

पौर्णिमेच्या यात्रेपूर्वीच संपूर्ण यल्लमा डोंगरावर जागोजागी प्रचंड गर्दी तसेच जागोजागी अस्वच्छता पाहायला मिळत आहे. त्यातच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दर्शनासाठी भाविकांना बराच उशीर ताटकळत राहावे लागत आहे. कुंडाच्या स्नानाच्या जागी झालेली प्रचंड गर्दी चिंतेचा विषय ठरणार आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यांना डोंगरावर भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली आहे. प्रचंड गर्दी पाहता भाविकांना चांगल्या प्रकारे सोई सुविधा उपलब्ध करून द्या, अशी सूचना मोहम्मद रोशन यांनी देवस्थान मंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी अशोक दुडगुंटी यांना केलेल्या आहेत.