बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा रुग्णालयात दुर्धर आजारावर उपचार सुरू असलेल्या एका वृद्धाचे शुक्रवार (दि.३१) जानेवारी रोजी निधन झाले. माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दामोदर चांदाळ (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
दामोदर चांदाळ हे गेल्या २८ वर्षांपासून रामदुर्ग (ता. बेळगाव) येथील हॉटेल अलंकारमध्ये काम करत तिथेचं वास्तव्यास होते. गतवर्षी ६ डिसेंबर रोजी त्यांना जुने बेळगाव येथील निराश्रित केंद्रात दाखल करण्यात आले होते. घशाच्या कर्करोगाने त्रस्त झाल्याने, काही दिवसात निराश्रित केंद्राचे व्यवस्थापक रावसाब शिरहट्टी यांनी उपचारासाठी त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवार (दि.३१) जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर रुग्णालय प्रशासनाने निराश्रित केंद्राचे व्यवस्थापक रावसाब शिरहट्टी यांना दामोदर चांदाळ यांच्या निधनाची बातमी दिली.
दामोदर चांदाळ यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न असल्याने आश्रमाचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा माधुरी जाधव यांनी तात्काळ आपल्या माधुरी जाधव फाउंडेशनमध्ये कार्यरत आकाश हलगेकर, शुभम दळवी, यांच्यामार्फत निराधार वृद्धावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली आणि शनिवार (दि. १) फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी माजी महापौर तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे व शंकर कांबळे यांचे सहकार्य लाभले.
0 Comments