- विजयपूर जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची माहिती
विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार याआधी नोंदविण्यात आली होती. त्या घटनांचा तपास पोलिसांच्या वतीने करण्यात येत होता. त्याला यश आले आहे. या कारवाईत १ कोटी ४७ लाख ७६ हजार ०५३ रु. जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कारवाई विषयी अधिक माहिती देताना निंबरगी पुढे म्हणाले, विजयपूर जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या.
स्टॉक मार्केट ट्रेडिंग, क्रिप्टो ट्रेडिंग अशा पद्धतीने झालेल्या फसवणुकीच्या १२ तक्रारी विजयपूर सीईएन पोलीस स्थानकात गेल्या तीन महिन्यात नोंदविण्यात आल्या होत्या.
या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. त्या पथकाला यश आले आहे. शहरातील सृष्टी कॉलनी येथील रहिवासी प्रा. शैलजा मुत्तीनपंडीमठ यांनी सीईएन पोलीस स्थानकात ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली होती.
सदर प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांचे बँक खाते गोठवा त्यांच्या खात्यातील ३१ लाख ५२ हजार रुपये तक्रारदारास परत करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तालिकोट येथील राज कोंगोडी यांच्याकडून ८७ लाख रुपयांची रक्कम आरोपींनी ट्रेडिंग ॲप्लिकेशनच्या नावाखाली घेतली होती. या तक्रारीवरून आरोपीचे बँक खाते गोठवण्यात आले असून त्यांच्या खात्यावरील ६८ लाख २५ हजार रुपये तक्रारदाराला परत करण्यात आले आहेत.
सिंदगी येथील सॉफ्टवेअर अभियंत्याचीही ऑनलाइन फसवणूक झाली होती. बाजारभावापेक्षा कमी किमतीत शेअर्स खरेदी करून दिले जातील असे सांगून १ कोटी रुपये आरोपींनी त्याच्या खात्यात पैसे जमा करून घेतले होते. आरोपीचे बँक खाते जप्त करण्यात आले असून ९ लाख ९७ हजार रुपये परत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील निखिल शिवानंद मोजी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय डॉलरमध्ये गुंतवणूक व दररोज शेकडा ४ टक्के लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार त्यांनी २ कोटी रुपये जमा केले होते. त्या तक्रारीची दखल घेत मोजी यांना ३८ लाख रुपये परत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमण गौडा हट्टी, शंकर मारिहाळ, डीवायएसपी सुनील कांबळे, सीपीआय रमेश आवजी इतर उपस्थित होते.
- अति लोभ हे फसवणुकीचे कारण :
इच्छा व लोभ हे फसवणुकीचे कारण आहे. ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा, ऑनलाईन व्यवहाराबाबत पूर्ण जागृत रहावे. एटीएम पीन, बँक खात्याचे तपशील विनाकारण कोणाशीही शेअर करू नका. बेकायदा रोख कर्ज मिळण्याच्या प्रयत्नात अडकू नका. ओळखी व्यक्तीचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख निंबरगी यांनी केले आहे.
0 Comments