- १५ हून अधिक जण गंभीर जखमी
यल्लापूर / वार्ताहर
उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुल्लापूर गावाजवळ बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग ६३ वर भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने १० हून अधिक जणांचा मृत्यू तर १५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान आता मृतांची संख्या ११ झाली आहे. फयाज जमखंडी (वय ४५), वसीम मुदगेरी (वय ३५), इजाज मुल्ला (वय २०), सादिक भाश (वय ३०), गुलाम हुसेन जावळी (वय ४०), इम्मियाज मुलकेरी (वय ३६), अल्पाझ जफर मंदाक्की (वय २५), जिलानी अब्दुल जखाती (वय २५) , अस्लम बाबुली लोणी (वय २४) , जलाल बाशा (वय २६) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक सावनूरहून कुमट्याकडे जात होता. यावेळी सावनूर तालुक्यातील २८ व्यापारी सदर ट्रकमधून प्रवास करत होते. दरम्यान गुल्लापूर जवळ आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला, त्यामुळे १० व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच १५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपचारांना प्रतिसाद न दिलेल्या आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला असून मृतांची संख्या ११ झाली आहे. दरम्यान आणखी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
0 Comments