बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक आवारात ९ फेब्रुवारी रोजी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जय्यत तयारी करण्यात येत असून मंगळवारी हुतात्मा स्मारक आवारात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. हुतात्मा स्मारक आवारात झुडपे वाढली होती. त्यामुळे परिसर स्वच्छ करणे आवश्यक होते. याशिवाय ९ फेब्रूवारी रोजी याच ठिकाणी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी जेसीबीच्या साहाय्याने वाढलेली झुडपे हटवून सपाटीकरण करण्यात आले. दोन दिवसांत गेट रंगवण्यात येणार असून स्मारकावर हुतात्म्यांची नावे कोरण्यात येणार आहेत.

आज स्वच्छतेवेळी तालुका समिती अध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, तालुका समिती युवा आघाडी अध्यक्ष राजू किणयेकर, सागर सांगावकर, डॉ. नितीन राजगोळकर, अंकुश पाटील, अनिल हेगडे, महादेव गुरव आदी उपस्थित होते.