बेळगाव / प्रतिनिधी 

येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या पुनर्रचनेबाबत चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी बालशिवाजी वाचनालय येथे पार पडली. या बैठकीला आजी - माजी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो युवा कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी बालशिवाजी वाचनालय येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी होते. बैठकीला येळ्ळूरमधील आजी - माजी ग्रामपंचायत सदस्य, गावातील जेष्ठ नागरिक आणि शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत येळ्ळूर विभाग म. ए. समितीची पुनर्रचना करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. समितीमध्ये जास्तीत जास्त युवकांना स्थान देण्यात यावे, तसेच पुढील काळात युवा कार्यकर्त्यांनी समितीशी एकनिष्ठतेने कार्य करावे, असे मत काही युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या चर्चेनंतर पुढील बैठक सोमवार, दि.  ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीला सर्व युवा, जेष्ठ नागरिक तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, शेकापचे विलास घाडी सर, वाय. सी. इंगळे, परशराम घाडी, तानाजी हलगेकर, ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नेते व समितिनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.