खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी गांभीर्याने पार पडला.
1956 मध्ये भाषावार प्रांत रचना झाली त्यावेळी मुंबई प्रांतात असलेला एक मोठा मराठी बहुभाषिक असलेला भूभाग अन्यायाने कर्नाटकाला जोडून मराठी भाषिकावर केंद्र सरकारने अन्याय केला. या विरोधात मराठी भाषिकांचा उद्रेक होऊन बरीच मोठमोठी आंदोलने, रास्ता रोको, साराबंदी असे उठाव झाले. या उठावांमध्ये बेळगाव व खानापुरातील मराठी भाषिकांना हौतात्म्य पत्कराव लागले. त्या त्या हुतात्म्यांना दरवर्षी 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन पाळून अभिवादन केले जाते. त्या अनुषंगाने आज शुक्रवारी सकाळी हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष सूर्याजी सहदेव पाटील यांनी ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये सतत सीमाप्रश्नाचा जागर सुरू आहे. जोपर्यंत हा संपूर्ण मराठी प्रदेश महाराष्ट्र मध्ये सामील होत नाही तोपर्यंत ही आंदोलने अशीच सुरू राहणार. आपली मराठी संस्कृती -परंपरेसह मराठी शाळा टिकवण्यासाठी येणाऱ्या पिढीला आपल्या समवेत घेऊन संघर्ष करून हुतात्म्यांचे सीमाभाग महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण करायच आहे, असे सांगितले. यावेळी खानापूर तालुका पंचायतचे माजी सभापती सुरेश देसाई यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून प्रश्नाची त्वरेने सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी खानापूर तालुका सचिव राजीव पाटील, ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील, बळीराम पाटील, गोपाळ गुंजकर, गजानन पाटील आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते व मराठी भाषिक उपस्थित होते.
0 Comments