बेळगाव / प्रतिनिधी 

केरूर (ता. चिक्कोडी) ग्रामपंचायत रोजगार हमी नरेगा योजने अंतर्गत सुरू असलेल्या गैरव्यवहाराचा निषेध करून त्याला विरोध करणाऱ्या गजेंद्र सत्यप्पा गस्ती आणि अनिल दाणी यांच्यावर हल्ला करणाऱ्या पिडीओंसह संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

केरूर ग्रामपंचायत रोजगार हमी नरेगा योजनेंतर्गत महिलांसह इतर कामगारांनी कर्नाटक राज्य रयत संघाच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी प्रसिद्धी माध्यमांची बोलताना कर्नाटक राज्य रयत संघाचे नेते जी. आर. दोडमणी यांनी सांगितले की, केरूर (ता. चिक्कोडी) ग्रामपंचायत हद्दीतील रोजगार हमी नरेगा योजने अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांच्या निधीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करून गजेंद्र सत्यप्पा गस्ती आणि अनिल दाणी हे त्याचा निषेध करून त्या गैरव्यवहाराला विरोध करत होते. 

त्यामुळे गेल्या शनिवारी केरूर पंचायत विकास अधिकाऱ्यांनी (पीडीओ) गैरव्यवहारात सामील असलेल्या सर्वांना बोलावून घेऊन ग्रामपंचायतीमध्ये आणि पंचायती बाहेर गस्ती व दाणी यांच्यावर हल्ला करविला. याप्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल झाला असला तरी आतापर्यंत हल्लेखोर अर्थात दोषींवर कारवाई झालेली नाही किंवा पीडीओंवर देखील कोणतेही क्रम घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी केरूर येथे नरेगा योजनेअंतर्गत सुरू असलेला गैरव्यवहार उघडकीस आणावा तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जावी.