• आमदार रोहित पाटील यांचे आवाहन 
  • तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने युवामेळावा 

बेळगाव / प्रतिनिधी 

राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना घडविले स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे आपल्यातील अस्मिता जागी करण्यासाठी जिजाऊ जयंतीसारखा दुसरा दिवस नाही. सीमाप्रश्नासाठी लढत असताना येत्या काळात आपण काय करतोय यापेक्षा काय करू नये, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपली चळवळ थांबू नये ती प्रत्येक घराघरात गेली पाहिजे, यासाठी आता युवकांनी आपली पिढी या लढ्यात संपणार नाही याचा निर्धार करून कामाला लागावे असे आवाहन तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी केले.

तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने रविवारी (दि. १२) स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवनात युवा मेळाव्याच्या आयोजन केले होते. युवा आघाडी अध्यक्ष राजू किणेकर आध्यक्षस्थानी होते. 

या मेळाव्यात  युवकांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील पुढे म्हणाले, आत्तापर्यंत अनेक पिढ्या या लढ्यात गेल्या आहेत. देशातील अनेक चळवळींची स्थिती वाईट आहे, पण सीमाभागातील लोकांना आता अस्मिता जागे करण्याचे काम करावे लागणार आहे. पिढ्यान् पिढ्यांचा हा संघर्ष आपल्याला वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागणार आहे. आपली पद्धत बदलल्याशिवाय आणि त्यानुसार संघर्ष केल्याशिवाय यश येणार नाही, सीमाप्रश्नावर काम करत असताना तांत्रिकदृष्ट्या कसे काम करावे, यासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेऊन नवे स्वरूप देण्याची गरज आहे अन्याय होत असताना तो सहन न करता आपण जागृतीने एकत्रित काम करणे आवश्यक आहे असेही आमदार रोहित पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना प्रा. मधुकर पाटील म्हणाले, मराठ्यांचा इतिहास गौरवशाली आहे. इतिहास वाचला पाहिजे. जे इतिहास वाचतात तेच इतिहास घडवू शकतात. मराठी माणसांनी संघटित होऊन उद्योगधंदे सुरू करावेत. मराठ्यांनी नेहमीच आपली एकजूट कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. 

प्रारंभी आमदार रोहित पाटील यांनी राजमाता जिजाऊ तर प्राध्यापक मधुकर पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. 

व्यासपीठावर तालुका समिती अध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, ॲड. एम. जी. पाटील, रमाकांत कोंडुसकर, तालुका समिती कार्याध्यक्ष आर.एम. चौगुले, माजी आमदार दिगंबर पाटील, शुभम शेळके, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, वक्ते प्रा. मधुकर पाटील, ॲड. तृप्ती सडेकर उपस्थित होते. मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक केले. शंकर कोणेरी यांनी आभार मानले.