कित्तूर / वार्ताहर
कित्तूरहून खानापूर मार्गे हुबळीकडे जात असताना दुचाकी झाडाला धडकून दुचाकीस्वारासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वर ही घटना घडली. संगोळ्ळी रायण्णा हुतात्मा दिनाचा एक भाग म्हणून खानापूर तालुक्यातील नंदगड गावात रायण्णा समाधीचे दर्शन घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.
संगोळ्ळी रायण्णा समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर दोघेही तरुण जुन्या हुबळीकडे परत जात असताना कित्तूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि महामार्गालगतच्या झाडावर गाडी आदळली. यात २ तरुण जागीच ठार झाले. रमेश आंदेप्पा आंबिगेर (वय २०, रा. ईश्वर नगर जुने हुबळी) व मदन चंद्रकांत मेटी (वय २० रा. एस. एम. कृष्णानगर) अशी मृत तरुणांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृतदेह शोविच्छेदनासाठी चित्तूर येथील शासकीय सामुदायिक केंद्रात पाठवण्यात आले आहेत. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नायक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडानगट्टी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद कित्तूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
0 Comments