- साहित्यिक व लेखक प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे प्रतिपादन
- येळ्ळूर येथे २० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
येळ्ळूर / वार्ताहर
कुटुंब ही पहिली शाळा आहे. पालकांना पुस्तकी ज्ञान नसेल तर मुलांना चांगली संस्कृती मिळणे कठीण आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी केले.
येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे परमेश्वरनगर येथील सरकारी मराठी शाळेच्या क्रीडांगणावर दिवंगत ॲड. परशुराम जोतिबा नाईक संमेलनगरीत २० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी पार पडले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून डॉ. बाविस्कर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक आर. एम. चौगुले , स्वागताध्यक्ष दुधाप्पा चांगप्पा बागेवाडी, यल्लोजीराव मेणसे, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, अर्जुन गोरल,अरुण सुळगेकर,रावजी पाटील, हणमंत कुगजी, शांताराम कुगजी, महेश जुवेकर आदी उपस्थित होते.
- वाचनातून संस्कृती विकसित होते : डॉ. शरद बाविस्कर
यावेळी ते पुढे म्हणाले, कुटुंब ही पहिली शाळा आहे. पालक हे पहिले शिक्षक असतात. घरच्या शाळेत पुस्तके नसल्यामुळे वाचन आणि संस्कृती शिकवणे अवघड होते. हे बळजबरीने शिकवले जाऊ शकत नाही. त्यामुळे पालकांनी आधी वाचनाची सवय लावली पाहिजे. वाचनातून आपली संस्कृती विकसित होते. चांगले व्यक्तिमत्व घडवते. पालकत्व ही तर्कशुद्ध जबाबदारी आहे. आधुनिक युगात मुलांवर संस्कार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी ध्वज व ढोल - ताशांचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा - तुकोबाचा जयघोष, लेझीम पथकाचा ताल, लक्षवेधी रांगोळ्या भगवे फेटे आणि पारंपरिक वेशभूषेत करण्यात आलेली ग्रंथदिंडी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे २० व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात सकाळी मुख्य मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वातावरणात मराठी संस्कृतीचे दर्शन घडले.
चांगळेश्वरी मंदिरासमोर सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेपासून ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. स्वरांगण ढोल ताशा पथकाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. भजनी मंडळ, लेझीम पथकासह एनसीसी विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ग्रंथदिंडी पाहण्यास नागरिकांची गर्दी झाली होती. ठिकठिकाणी ग्रंथ दिंडीचे स्वागत करण्यात आले. विविध सोसायटींतर्फे मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. तत्पूर्वी ग्रंथदिंडीचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष शरद बाविस्कर, माजी आ. परशुरामभाऊ नंदिहळळी, उद्योजक गोविंद टक्केकर, सूर्यकांत शानभाग, ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, ॲड. शरयू हिंडलगेकर, शिवानी पाटील, यल्लुपा पाटील, विजय नंदीहळळी, रूपा धामणेकर यांच्या उपस्थितीत झाले.
शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विविध प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर उद्योजक आर. एम. चौगुले यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. सी. एम. गोरल यांनी प्रास्ताविक केले. वाचन चळवळ रुजवण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज असून साहित्य संमेलनातून मराठी भाषेवरील प्रेम वृद्धिंगत होते, असे त्यांनी सांगितले. स्वागत दुधाप्पा बागेवाडी यांनी केले. मान्यवरांचे पुष्प स्मृतिचिन्ह शाल देऊन स्वागत करण्यात आले.
- सीमाभागातील मराठी भाषेच्या विकासात येळ्ळूरची महत्त्वाची भूमिका : आर. एम. चौगुले
संमेलनाचे उद्घाटन करताना आर. एम. चौगुले म्हणाले, अन्न वस्त्र व निवारा याप्रमाणे भाषा महत्त्वाची आहे. त्यामुळे भाषेचा विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. भाषेच्या विकासात साहित्य संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात. सीमाभागातील मराठी भाषेचे जतन आणि विकास करण्याचे काम येळ्ळूर साहित्य संमेलनाने केले आहे. येळ्ळूर गाव हे संघर्ष, त्याग आणि भाषा विकासाचे केंद्र आहे. पुस्तकांमुळे जग पुढे जात आहे. ज्ञानाचे अमृत घेऊन प्रत्येकाने व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असे सांगितले.
येळळूर मराठी ग्रामीण साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे म्हणाले, ज्ञान विचार व चळवळीचा यज्ञकुंड अखंड सुरू ठेवण्याची जबाबदारी युवकांची आहे. महाराष्ट्रात समाविष्ट होईपर्यंत साहित्याची पालखी सुरू ठेवूया.
यावेळी ॲड.सुधीर चव्हाण, नागोजी गावडे, निलेश पाटील, अंकुश केसरकर, अमर जाधव, अभिषेक पाखरे, ॲड. अजय सातेरी, ॲड. सतीश बांदिवडेकर, प्रमोद पाटील, प्रसाद मजुकर, आकाश चौगुले, प्रकाश अष्टेकर आदी उपस्थित होते.
- सीमाप्रश्नासह पाच ठराव संमत :
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली ठराव
- २००४ पासून सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याचा निकाल लागण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावेत.
- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्याबद्दल केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन व साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
- शिक्षणाचे खासगीकरण होऊ नये.
- राज्यशासनाने पत्रकारांना सुरक्षा द्यावी. त्याचबरोबर पेन्शन सुरु करावी.
0 Comments