खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील नंदगड गावात येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये महालक्ष्मी यात्रा होणार आहे. दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी लक्ष्मी अक्षता रोपणाच्या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात होणार आहे. 

तब्बल २४ वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या यात्रेच्या निमित्ताने नंदगड महालक्ष्मी यात्रा कमिटीने परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकले असून एकजुटीने आहेर पद्धतीला फाटा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे माजी आमदार अरविंद पाटील आणि तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष गुरव सांगितले.

यात्रा कमिटीने भाविकांना “आहेर” न आणण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले असून यात्रेला येणाऱ्यांनी केवळ महालक्ष्मीचे दर्शन घेऊन देवीचा आशीर्वाद मिळवावा, आणि साधेपणाने यात्रा साजरी करावी असे कळविण्यात आले आहे.

यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गावात महालक्ष्मी मंदिर परिसरात मंडप उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर रथाची तयारी ८० टक्के पूर्ण झाली आहे. राम मंदिराचा देखावा यात्रेचे मुख्य आकर्षण असेल. यात्रेच्या निमित्ताने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरच पूर्णत्वास येतील. 

गावाबाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून गावात गाड्यांची गर्दी होणार नाही. भाविकांनी वाहन गावाबाहेर पार्क करूनच यात्रेला यावे अशी सूचना करण्यात आली आहे.

यात्रेच्या निमित्ताने नंदगड आणि खानापूर भागातील कुस्तीप्रेमींसाठी विशेष कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय स्थानिक नाटक, संगीत आणि विविध भाषिक समाजासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

यात्रेसाठी खासदार, आमदार, आणि जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मिळाले आहे. सुरक्षा, वैद्यकीय व्यवस्था, आणि पाणीपुरवठा यांसारख्या गरजांची पूर्तता व्यवस्थितपणे केली गेली आहे. नंदगड धरणातून चोवीस तास पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.