बेळगाव : १७६ वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या ५० व्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार दि. १८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी बेळगाव येथे बेळगावचे इंजिनियर व बिल्डर्स मा. श्री. अनंतराव नारायण पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प १८ जानेवारी रोजी इचलकरंजी येथील व्याख्याते मा. प्रथमेश इंदुलकर हे 'संस्कार महापुरुषांचे' या विषयावर गुंफणार आहेत. त्यानिमित्त उद्घाटक व वक्ते यांचा अल्पपरिचय.

  • उद्घाटक अनंतराव पाटील यांचा अल्पपरिचय -

अनंतराव नारायण पाटील, वडगाव शिक्षण जी.आय.टी. महाविद्यालयातून १९८६ साली बी.ई. ही पदवी संपादन केल्यानंतर १९९० पासून स्वतंत्रपणे बांधकाम व्यवसायात उतरले. आतापर्यंत बेळगाव शहर व परिसरात ३० बहुमजली निवासी प्रकल्प, ५ कमर्शियल प्रकल्प आणि अनेक ले-आऊट करुन हजारो लोकांची निवासाची व व्यवसाय जागेची सोय केली आहे. ते श्री आधार मल्टीपर्पज सोसायटीचे सुरुवातीपासून संचालक व माजी चेअरमन आहेत. क्रेडाई व मारुती मंदिर ट्रस्ट, वडगाव या संस्थांचे संचालक आहेत. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या अनंतराव पाटील यांनी अनेक संस्थांना अर्थसाहाय्य केले आहे. आनंद इन्फ्रास्ट्रक्चर, देसाई पाटील बिल्डर्स, ए. एस. डेव्हलपर्स व सायली बिल्डर्स या उद्योगांचे ते भागीदार आहेत.

  • वक्ते प्रथमेश इंदुलकर यांचा अल्पपरिचय -

प्रथमेश इंदुलकर हे इचलकरंजीचे असून ते उच्चशिक्षित आहेत. वयाच्या १२ व्या वर्षापासून वक्तृत्व कलेची सुरुवात. त्यांचे आज वय अवघे २५ वर्ष आहे. कमी वयातील नामवंत व्याख्याता म्हणून अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची व्याख्याने झाली आहेत. महाराष्ट्रा बाहेर देखील व्याख्याने व किर्तनाचा त्यांचा प्रवास सुरु आहे. व्याख्यानासोबतच प्रवचनकार व किर्तनकार म्हणून देखील महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. वैचारिक पातळी, पहाडी आवाजाची ठेवणं व सोशल मिडियावर व्हिडीओच्या माध्यमातून प्रबोधन यामुळे युवा वर्गाचे प्रेरणादायी व्यक्तीमत्व. त्यांचे 'विचारधारा' नावाचं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.