बेळगाव / प्रतिनिधी
वाळू वाहून नेणारा टिप्पर चालत्या दुचाकीवर आदळून दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. अलतगे (ता. बेळगाव) येथील खडीमिशन क्रॉसजवळ बुधवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
योगेश संभाजी न्हावी (वय २४) व नितेश वैजू तरळे (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. योगेशच्या पश्चात आई व एक बहिण असा परिवार आहे. तर नितेशच्या पश्चात आई-वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे. हे दोघेही कुटुंबांचे एकुलते एक पुत्र होते.
हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही मृतदेहांच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या होत्या. तर टिप्परखाली अडकलेले मृतदेह सहजासहजी काढता येत नव्हते. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. पण दोन्ही तरुण आणि दुचाकी टिप्परखाली सापडले होते.
अपघातानंतर काकती पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असून पुढील तपास सुरू आहे. उद्या सकाळी ११ वा. आंबेवाडी गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे आंबेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
0 Comments