- अभिनेत्री वंदना गुप्ते आकर्षण
- मराठी साहित्य संमेलन
येळ्ळूर, ता. ४ :
येळ्ळूर येथे आज रविवार (ता. 5) रोजी, 20 वे येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वर नगर येळळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना गुप्ते ही उपस्थित राहणार आहेत. संमेलन पाच सत्रात होणार आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, संमेलनाचे उद्घाटन उद्योजक आर. एम. चौगुले यांच्या हस्ते होणार आहे, त्यानंतर स्वागताध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी उपस्थितांचे स्वागत करणार आहेत. पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे.
तर दुसऱ्या सत्रात पुण्याचे साहित्यिक दत्ता देसाई हे "आपली संस्कृती, आपला विकास " यावर आपले विचार मांडणार आहेत. तर तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कार वितरण. याचबरोबर "एक तास बसा... मनसोक्त हसा" हा विनोदी कार्यक्रम लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे हे सादर करणार आहेत. तर चौथ्या सत्रात सिने अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तर पाचव्या सत्रात 'जागर लोककलेचा ' हा जुगलबंदी भारुड, विनोदी कार्यक्रम संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करणार आहेत. संमेलन नगरीला दिवंगत ॲड. परशुराम नाईक असे नाव देण्यात आले आहे, तर दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. दिवंगत बाबुराव गोरल यांचे नाव ग्रंथदालनाला देण्यात आले आहे. तर दिवंगत रामचंद्र गोरल यांचे नाव सभामंडपाला देण्यात आले आहे. संमेलनाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
- संमेलन दृष्टीक्षेपात :
- ग्रंथदिंडी - सकाळी 8:30 वाजता चांगळेश्वरी मंदिरापासून सुरू
- उद्घाटन - सकाळी 10 वाजता
- स्वागत - सकाळी 10:15 वाजता
- उद्घाटक व स्वागत भाषण - 10:30 वाजता
- अध्यक्षीय भाषण - सकाळी 10:45 वाजता
- प्रकट विचार - 1.00 वाजता
- अल्पोपहार - 2.30 ते 3:00 वाजेपर्यंत
- विनोदी कार्यक्रम - 3 ते 4 वाजेपर्यंत
- अभिनेत्रीची मुलाखत - 4 ते 5
- जुगलबंदी भारुड - 5 ते 6:30
0 Comments