बेळगाव / प्रतिनिधी
देशाची राजधानी दिल्लीत दि. २१ ते २३ फेब्रुवारी या काळात होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन परिसरास छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव देण्याचे महामंडळ तसेच सरहद या संयोजक संस्थेने ठरविले आहे.
महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे तसेच सरहद संस्थेचे संजय नहार यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी साहित्य संमेलनाला येणाऱ्या रसिकांसाठी पुणे - दिल्ली रेल्वे देण्याबाबत स्वतः अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विनंती केली आहे. रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र एका रेल्वेत मर्यादित साहित्य रसिकांना समाविष्ट करणे शक्य असल्याने या रेल्वेवर अवलंबून न राहता महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी आपापल्या भागातून आपले दिल्लीसाठी आरक्षण करावे म्हणजे ऐनवेळी गडबड होणार नाही असेही आवाहन संयोजकांनी केले आहे. संमेलनाला येणाऱ्यांची सोय करणे शक्य व्हावे, यासाठी आपल्या जवळच्या साहित्य संघात अथवा ऑनलाईन प्रतिनिधी शुल्क भरून १५ जानेवारी २०२५ पुर्वी नोंदणी करावी काही अडचण आल्यास ८४८४०५५२५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
0 Comments