बेळगाव : मण्णूर येथील कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणारे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या माध्यमातून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या एम डी चौगुले प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून दहावीच्या विद्यार्थ्यांची उजळणी करवून घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
यावर्षीही बेळगाव परिसरातील तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने या व्याख्यानमालेचे आयोजन कलमेश्वर हायस्कूल मण्णूर येथे करण्यात आले असून आजवर या व्याख्यानमालेचा लाभ घेणारे अनेक विद्यार्थी आज इंजिनियरिंग, डिप्लोमा, नर्सिंग, मेडिकल सारख्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. व्याख्यानमाला आयोजित करण्याचे हे आठवे वर्ष असून सलग सहा रविवार ही व्याख्यानमाला चालणार आहे. व्याख्यानमालेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकर्षक बक्षीसे देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय विषयवार प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमती द्रौपदी एम. चौगुले मातृमांगल्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या व्याख्यानमालेची सुरुवात रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी गणित विषयापासून होणार असून शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळीचे मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ५ जानेवारी २०२५ रोजी मराठी विज्ञानिकेतन हायस्कुलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक सुनिल लाड, १२ जानेवारी २०२५ रोजी सरदार्स हायस्कुलचे समाज परिचय विषयाचे शिक्षक रणजित चौगुले यांचे व्याख्यान होणार आहे
१९ जानेवारी २०२५ रोजी ठळकवाडी हायस्कूलचे कन्नड विषयाचे शिक्षक संजीव कोष्टी, २ फेब्रुवारी २०२५ रोजी ठळकवाडी हायस्कूलचे मराठीचे शिक्षक सी वाय पाटील, व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ठळकवाडी हायस्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक सुरेश भातकांडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानमालेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन अधिक गुणवत्ता प्राप्त करावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आर. एम. चौगुले आणि सचिव डी. एम. चौगुले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४४८४८७५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
0 Comments