खानापूर / प्रतिनिधी
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. पण कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आले. उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी हा आदेश बजावला. मात्र या निलंबना विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी खानापूर भाजपने विविध संघटनांच्यावतीने उद्या खानापूर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण खानापूर पोलिस विभागासाठी डोकेदुखी ठरले आहे.
गुरूवारी (ता. १९) रोजी हिरेबागेवाडी येथून भाजपचे विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूरात आणले होते. तत्पूर्वी, खानापूर पोलिस स्थानकात आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना करण्यात आली होती. यावेळी त्यांनी पोलीस स्थानकात भाजप नेत्यांची बैठक घेतली. नाईक यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कायदा आणि सुव्यवस्था हताळण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे उत्तर विभागाचे आयजीपी विकास कुमार विकास यांनी ही कारवाई केली.
सी. टी. रवी रवी प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस प्रमुख किंवा शहर पोलीस आयुक्तांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पण खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांचे निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनाचा निषेध करत कन्नड समर्थक संघटनांनी उद्या खानापूर बंदची हाक दिली आहे. भाजप - जेडीएस पक्षांनीही बंदच्या आवाहनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
0 Comments