• मंडोळी येथील घटना 

बेळगाव / प्रतिनिधी 

एका लग्नसोहळ्यात क्षुल्लक वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मंडोळी (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली. प्रदीप अष्टेकर असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेत जखमी झाल्याने  प्रदीप अष्टेकर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या सोहळ्यात जवळपास २०० लोक सहभागी झाले होते. 

त्यामध्ये प्रदीप अष्टेकर (रा.बी.के.कंग्राळी ता.बेळगाव) याच्यावर लग्नसोहळ्यात सहभागी असलेल्या तीन व्यक्तींनी भ्याड हल्ला केला, प्रदीपला बळजबरीने खाली पाडून, त्याच्या तोंडाचा चावा घेतला. त्याचे डोके, ओठ, कपाळ आणि डोळ्यांच्या जवळील भागाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हल्ल्याबाबत प्रदीपने माहिती देताना प्रदीप म्हणाले, लग्नसोहळ्यातील जेवणासाठी घरातून नेलेली चपाती परत मागितल्यामुळे तीन जणांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला खाली पाडून मारहाण केली आणि घरात घुसूनही दगडफेक केली. माझ्या ओठाला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमेवर ८ टाके पडले आहेत," असे त्यांनी सांगितले.

यावेळी हल्लेखोरांनी घरात घुसून प्रदीपच्या कुटुंबावरही हल्ला केला. त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. हल्ल्यात प्रदीपला गटारीत फेकून देत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत प्रदीप अष्टेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकांत या प्रकरणाचा तपास सुरू आहे.