बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून बेळगावातील सुवर्ण सौध येथे सुरू होणार आहे. याउलट दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीने परवानगीशिवाय महामेळावा आयोजि करण्याचा निर्णय घेतला आहे. टिळकवाडी येथील व्हॅक्सीन डेपो मैदानावर जाऊन समिती नेत्यांनी मेळाव्याबाबत चर्चा केली.
आम्हाला परवानगी मिळो की नाही. महाराष्ट्र सरकारला साथ द्या. पण आम्ही बेळगावचे मराठी भाषिक आमच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी महामेळावा घेणार आहोत, आम्हाला अटकेची भीती नाही. युवा शक्ती संघटित होऊन महामेळावा यशस्वी करेल. आज सकाळी ११ वाजता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कल किंवा व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा होणार आहे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले.
ज्येष्ठ नेते प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नेहमीच लढा दिला आहे. महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घ्यावा असे ते म्हणाले.
युवा नेते आर. एम. चौगुले म्हणाले की, कर्नाटकात अनेक जिल्हे आहेत. त्याशिवाय २००६ पासून कर्नाटक सरकार हिवाळी अधिवेशन बेळगाव या सीमावर्ती जिल्ह्यात घेत आहे. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रत्येक वेळी महामेळावा आयोजित करून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे. आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या वेळी आपण न्याय हक्कासाठी आंदोलन करतो तेव्हा आपला आवाज दाबला जातो. अटकेला आम्ही घाबरत नाही. आपण महामेळावा घेऊन समाप्त करू. आमचा आवाज दडपण्याचा जितका प्रयत्न केला जाईल तितका आमचा लढा अधिक तीव्र होईल असे युवा नेते शुभम शेळके यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते उपस्थित होते.
0 Comments