बेंगळूर / वार्ताहर
ज्येष्ठ राजकीय नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे काल मंगळवारी पहाटे निधन झाले. बेंगळूर येथील सदाशिवनगर निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज बुधवारी सायंकाळी मंड्या जिल्ह्यातील त्यांच्या मूळ मुद्दुर गावी शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमा, मुली शांभवी, मालविका असा परिवार आहे.
अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी,माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, विधानसभेचे अध्यक्ष यु.टी. खादर, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विरोधी पक्षनेते आर.अशोक, यांच्यासह अनेक मंत्री तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. एस.एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा दुःखवटा जाहीर केला आहे.त्याचबरोबर आज बुधवारी सुट्टी जाहीर केली होती.
0 Comments