• थेट सेवेत सामावून घेण्यासह सेवेत कायम करण्याची मागणी 

बेळगाव / प्रतिनिधी 

गेल्या २० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या चालकांना थेट सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी बेळगाव महापालिकेसमोर आज आंदोलन करण्यात आले.

बेळगाव महापालिकेच्या वतीने कंत्राटी पध्दतीने सेवा बजावत असलेल्या नागरी कामगारांना महानगरपालिकेने थेट भरती करून कायम केले आहे. त्यानुसार गेल्या २० - २५ वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या वाहनचालकांना थेट सेवेत सामावून घेऊन त्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या वाहन चालकांनी बेळगाव महापालिकेसमोर आंदोलन केले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असता, त्यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. 

आम्ही ६७ जण २०-२५ वर्षे बेळगाव महानगरपालिकेच्या कचरा विल्हेवाट लावणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून काम करत आहोत. आम्ही जीव मुठीत घेऊन सेवा करत असून आम्हाला थेट भरती करून कायम करण्यात यावे, अशी मागणी चालक विशाल चलवादी यांनी केली. या आंदोलनात महापालिकेचे कंत्राटी तत्त्वावर सेवा देणारे चालक आणि ऑपरेटर सहभागी झाले होते.