धारवाड / वार्ताहर 

टेम्पो ट्रॅव्हलर आणि कँटर यांच्या भीषण अपघातात कँटरमधील तिघा जणांचा मृत्यू झाला. धारवाड जिल्ह्यातील अळणावर शहराजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली.

हनुमंत मल्लद (वय ३६), महांतेश चौहान (वय ३५) आणि महादेवप्पा हलोल्ली (वय ३५) तिघेही (रा. शिरसंगी जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत.

अपघातावेळी टेम्पो ट्रॅव्हलर चित्रदुर्ग मार्गे गोव्याकडे तर कँटर धारवाडहून गोव्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी वळणावर कँटर पलटी होऊन टेम्पो ट्रॅव्हलरवर आदळल्याने हा अपघात झाला.

या घटनेत कँटर चालक आणि टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवासीही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अळणावर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.