सुळगा (हिं.) / वार्ताहर 

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव पाटील यांनी ८४,२५४ मतांसह तब्बल २४,१३४ इतक्या मताधिक्क्याने बाजी मारली.  


या पार्श्वभूमीवर सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळगा (हिं.) येथे बेळगाव ग्रामीण भाजपच्या वतीने चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विजयानिमित्त गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरानजीक पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी वारकरी सेवा प्रतिष्ठान बेळगावचे अध्यक्ष, परशराम राजाराम तुप्पट, बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनय कदम तसेच कोवाड (ता. चंदगड) येथील आमदार शिवाजीराव पाटील यांचे निकटवर्तीय तथा पत्रकार लक्ष्मण यादव यांनी शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारार्थ निवडणूक काळात परिश्रम घेतलेल्या सीमाभागातील भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच आमदार शिवाजीराव पाटील यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याशिवाय शिवाजीराव पाटील आमदार झाल्याने सुळगा गावातील त्यांचे खंदे समर्थक दिवंगत ग्रा. पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शट्टूप्पा उर्फ बाळू पाटील यांचे स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव ग्रामीण भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


सातत्याने जनतेच्या संपर्कात असणारे लोकनेते अशी ओळख असलेल्या शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कार्य कौशल्यातून जनमानसात स्वतःच्या कर्तुत्वाची छाप निर्माण केली आहे. या विजयामुळे महाराष्ट्रात "देवाभाऊ" आणि चंदगडमध्ये "शिवाभाऊ" हे जनतेचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्ष साकारले आहे.

- या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇 -