• मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घडवले माणुसकीचे दर्शन 

बेळगाव / प्रतिनिधी 

अभ्यासात अडथळा आणणाऱ्या स्वतःच्या वडिलांचा छळ सहन न झालेल्या १२ वर्षीय होतकरू विद्यार्थिनीला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तात्काळ आर्थिक व शैक्षणिक मदत केली आणि माणुसकीचे दर्शन घडवले. 

शुक्रवारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर मतदारसंघातील विविध भागातील विकासकामांचे भूमीपूजन करून घरी पोहोचल्या, तेव्हा बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या हिरेबागेवाडी गावातील एक मुलगी स्वतःच्या आजीसोबत तिथे उभी होती. वडील नियमितपणे दारूच्या नशेत तिला आणि  तिच्या आईला शिवीगाळ करायचे. मात्र, हिरेबागेवाडी येथील एका खासगी शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलीने शाळा सोडण्यास नकार दिला. पण वडिलांकडून होणारा छळ ती सहन करू शकली नाही. त्यामुळे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे गेल्यास थोडा दिलासा मिळेल, या आशेने ती आजीला घेऊन आली होती. यावेळी युवा नेते मृणाल हेब्बाळकर या तरुणीची व्यथा ऐकत होते. कुठेही वसतिगृहात राहून अभ्यास करण्याची माझी तयारी आहे, पण मी घरी राहू शकत नाही आणि अभ्यास थांबवणार नाही, असे त्या मुलीने मंत्री हेब्बाळकर यांना रडत सांगितले. 

यावर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तात्काळ महिला व बालविभागाचे उपसंचालक नागराज यांना फोन करून मुलीची राहण्याची व शिक्षणची व्यवस्था त्यांच्या विभागाच्या सौंदत्ती येथील कन्या वसतिगृहात करावी, अशी सूचना केली. मंत्र्यांनी मुलीला आवश्यक कपडे व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतही केली. ही मुलगी माझी मुलगी असल्याने तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. उत्तम शिक्षण आणि भविष्यासाठी व्यवस्था करावी,अशी सूचना मंत्री हेब्बाळकर यांनी केली.

त्याचप्रमाणे त्या मुलीचे सांत्वन करताना मंत्री हेब्बाळकर यांनी तुझ्या अभ्यासाची सर्व व्यवस्था केली जाईल. तेव्हा तू चांगला अभ्यास करून उज्ज्वल  भविष्य घडवं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महिला व बालविभागाच्या कर्मचाऱ्यांसह आलेल्या उपसंचालक नागराज यांनी मुलीला सौंदत्ती वसतिगृहात दाखल करण्यासाठी पावले उचलली. मुलीची चांगली काळजी घेतली जाईल. वर्षातील ३६५ दिवस तिच्यासाठी जेवण आणि राहण्याची सर्व व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.