मण्णूर / वार्ताहर 

मण्णूर (ता. बेळगाव) येथील मराठी प्राथमिक शाळेच्या सहकार्यातून रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे गावात साक्षरता जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली होती.   

प्रारंभी शाळेपासून विद्यार्थ्यांनी हातात साक्षरता फलक घेऊन जनजागृती रॅलीला सुरुवात केली. शिवाजी चौकात रॅलीची सांगता झाली. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा आरटीएन रुपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि साक्षरता जागृती मोहिमेचा उद्देश सांगितला. 

याप्रसंगी म. ए. समितीचे  युवा नेते आर. एम. चौगुले यांनी मेळाव्याला संबोधित करून साक्षरतेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरटीएन डॉ. स्मृती प्रधान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थी अभ्यासात रस का घेत नाहीत हे स्पष्ट केले. अखेर शालेय विद्यार्थ्यांच्या छोट्या रोड स्किटने या मोहिमेचा समारोप झाला.  

सदर मोहिमेसाठी मण्णूर मराठी प्राथमिक शाळेचे विश्वस्त, शाळेचे मुख्याध्यापक,  शिक्षक, विद्यार्थी, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचे सदस्य तसेच मण्णूर ग्रामस्थ उपस्थित होते. एमओसी शाळेच्या शिक्षिका सौ. राजश्री चिगरे यांनी सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रम अतिशय सुरळीतपणे हाताळला.