दिपावली : अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. याच निमित्ताने जाणून घेऊया दिवाळी पाडव्याचे महत्त्व...
बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
- बळीचे राज्य येवो...
वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.
- व्यापारी वर्गाचे नववर्ष...
अश्विन अमावास्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)
0 Comments