• मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघाच्या विकासासंदर्भात बैठक 

सौंदत्ती / वार्ताहर 

सौंदत्ती मतदारसंघाच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी मतदारसंघात निवास, दर्शन व्यवस्थेसाठी प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. उत्तर कर्नाटकातील सौंदत्ती मतदारसंघाच्या विकासाबाबत घेतलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी श्री यल्लम्मा देवी मंदिराच्या सर्वसमावेशक विकास आराखड्याची रूपरेषा स्पष्ट केली. 

पौर्णिमेच्या काळात सुरळीत वाहतूक व्यवस्थापनासाठी इंट्रानेट वॉकीटॉकी प्रणाली आवश्यक असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.भीमाशंकर गुळेद  यांनी स्पष्ट केले. पर्यटन विभागाचे मंत्री एच.के.पाटील म्हणाले की, यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी येणारे अनेक लोक गरीब आणि अशिक्षित आहेत. त्यामुळे स्वच्छता, निवास आणि सुरळीत दर्शनासाठी योग्य व्यवस्था करावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.  तर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पर्यटन व मंदिर विकास मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून नवीन प्रकल्प राबवण्याची सूचना केली.  

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, भाविक पडली  भरून जोगतीला नैवेद्य देतात. गर्दी जास्त असताना दर्शन घेता येत नाही; त्यामुळे प्रत्येकासाठी योग्य ती व्यवस्था असे त्यांनी सांगितले. या क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारने २५ कोटी रुपये द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. श्री यल्लम्मा (रेणुका) देवीच्या दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि गोवा येथून येणाऱ्या भाविकांना उत्तम निवास व दर्शन दिले जावे. दरवर्षी कोट्यवधी भाविक येत असल्याने सुरळीत दर्शनाची व्यवस्था करण्यासह चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे पहिले प्राधान्य आहे, तर भाविकांची संख्या आणखी वाढेल. सुलभ दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

या बैठकीला मुजराई व परिवहन विभागाचे मंत्री रामलिंग रेड्डी, वायव्य परिवहन महामंडळाचे नियमित अध्यक्ष भरमागौडा कागे, आमदार विश्वास वैद्य, बाबासाहेब पाटील, आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, पर्यटन विभागाचे संचालक के. व्ही.राजेंद्र पाटील, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदि उपस्थित होते.