• ग्रा. पं. बैठकीत निर्णय  

सुळगा (हिं.) : येथील गावामध्ये ग्रामस्थांच्या सल्ल्यानेच संगोळ्ळी रायण्णा पुतळा उभारणी होणार आहे. सुळगे गावातील सर्व युवक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्यावतीने व सर्वांच्या सल्ल्यानुसार पुतळा कोठे उभा करावा, जागा कुठे द्यावी हे ठरल्याशिवाय गावामध्ये कुठेही पुतळा उभारणी करू नये, असा सर्वानुमते ठराव मंगळवार दि. २९ रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

संगोळ्ळी रायण्णा पुतळा उभारणी वरून सुळगे गावात वादाची ठिणगी पडली असून संघर्ष वाढल्याने  ग्रामस्थ आणि ठराविक समाजाच्या नागरिकांमधील वाद विकोपाला गेला आहे. परिणामी गावातील शांतता भंग होत असून या वादावर तोडगा काढण्यासाठी सुळगा ग्रामपंचायतमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला सुळगे गावातील सर्व युवक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान सोमवारी रात्री सुळगा (हिं.) येथे रात्री विनापरवाना पुतळा उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंधाराचा फायदा घेत हा पुतळा उभारला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील युवक, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे रात्रीपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे गावात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.

गावामध्ये संगोळळी रायण्णा पुतळा उभारणीला ग्रामस्थांचा विरोध नाही मात्र ग्रामस्थांचे म्हणणे असे आहे की ज्या भागात सदर समाज राहतो त्याच भागात सदर पुतळा उभा करावा. यामुळे या पुतळ्याची देखभाल पूजा-अर्चा योग्य प्रकारे होईल. मात्र सदर समाजाच्या युवकांनी हट्टाला पेटून गावातील ठराविक जागेतच पुतळा उभा करणार, असा हट्ट धरल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी याला विरोध करत ठराविक जागेतच पुतळा उभा करावा. आम्हीही त्याला सर्वतोपरी  सहकार्य करू, असे मत व्यक्त केले आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच काही युवकांकडून, तसेच गावाबाहेरील  काही युवक विनाकारण गावातील सर्व काही समाजाच्या युवकांना चिथवत असल्याने गावाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न चालला आहे, त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे.