- ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार
सुरू होते. बुधवारी (दि. 9) साडे अकरा वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाने भारतासह जगभरातील उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे.
दोन दिवसांपुर्वी रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यानंतर 'काळजीचे कोणतेही कारण नाही. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणले गेले आहे' असे त्यांच्याकडून कळवण्यात आले होते. मात्र बुधवारी ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
रतन टाटा यांनी देशासाठी दिलेले योगदान हे खूप मोठं आहे. तसेच रतन टाटा यांच्याविषयी संपूर्ण देशाला वेगळीच आपुलकी होती यात काहीही शंका नाही. देशभक्ती आणि देशहिताचे आदर्श, उद्योग जगतातले पितामह अशी रतन टाटांची ओळख होती.
रतन टाटा देशातील जवळपास प्रत्येकाच्या आवडत्या उद्योजकांपैकी एक होते. सर्वात मोठा व्यवसाय समूह असलेल्या टाटा या समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी या समूहाचा विस्तार केला. जगातील सर्वात लहान कार नॅनो तयार केल्याने रतन टाटा जगभरात प्रसिद्ध झाले.
0 Comments