- केंद्रीय कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे
- अशोकनगर येथील जुन्या ईएसआय रुग्णालयाला दिली भेट
बेळगाव / प्रतिनिधी
केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी बेळगाव अशोक नगर येथील ईएसआय रुग्णालयाला भेट दिली. या भेटीवेळी येथील डॉक्टर रुग्णांशी संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच इमारतीच्या जीर्ण अवस्थेची पाहणी केली.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या, बेळगाव हे सर्वाधिक कामगार विमा कार्ड असलेले शहर आहे. बेळगाव हे विविध राज्यांशी संबंधित सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. येथे सुमारे ३ लाख आयपीधारक आहेत. बेळगावात १९८८ मध्ये बांधलेले ईएसआय रुग्णालय जीर्ण झाले असून नवीन इमारत बांधण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. येथे ५० खाटांचे रुग्णालय असून, कार्डधारकांच्या वाढत्या संख्येवर आधारित १५२ कोटी रुपये खर्चून १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. हे रुग्णालय औद्योगिक क्षेत्रापासून दूर असून भूखंडही लहान आहे. सुसज्ज रुग्णालय बांधण्यासाठी संबंधित आमदारांनी औद्योगिक क्षेत्राजवळ जमीन देण्याची विनंती केली असून, दिल्लीत जाऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ईएसआय कार्डधारकांना आजीवन कार्ड योजना उपलब्ध करून देण्याची केंद्राची वचनबद्धता आहे. त्यांचा वैद्यकीय खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. ईएसआय रुग्णालये अद्यावत केली जातील. बेळगावातील कामगारांच्या हितासाठी केंद्र सरकार नवीन ईएसआय रुग्णालय बांधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
ईएसआय रुग्णालयाच्या स्थलांतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, अनुकूल वातावरण असल्यास रुग्णालय बांधले जाईल. सध्या हे रेफरल सेंटर असून रुग्णांना इतरत्र रेफर केले जात आहे. संपूर्ण देशातील रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. यावर तोडगा काढण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभा सदस्य इराण्णा काडाडी, दक्षिणचे आमदार अभय पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिला बेनके आदि उपस्थित होते.
0 Comments