- रस्त्याच्या बांधकामाकडे शासनाचे दुर्लक्ष : संतप्त ग्रामस्थांनी नोंदवला निषेध
- तातडीने रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशारा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ते बाचीला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रोपे लावून शासनाच्या दुर्लक्षित वृत्तीचा निषेध करण्यात आला. बेळगाव ते बाचीला जोडणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचून दररोज अपघात होत आहेत. हिंडलगा, सुळगा, कल्लेहोळ, उचगाव, तुरमुरी, बाची, कुद्रेमनी या रस्त्याच्या दुरवस्थेचा आज येथील ग्रामस्थांनी हिंडलगा गणपती मंदिरानजीक खड्ड्यांमध्ये नारळ, केळीचे रोप लावून निषेध केला.
बेळगाव - बाची मार्गाची दुरवस्था झाली आहे. बाची आणि नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रवासी याच रस्त्याचा वापर करतात. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची वाहनेही याच मार्गाने दररोज जातात. मात्र या रस्त्याचा विकास कोणीच करत नाही. गेल्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असता त्यांनी येऊन तपासणी केली. मात्र आजपर्यंत दुरुस्तीचे काम झालेले नाही. दुरुस्तीचे काम लवकर न झाल्यास रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य डी.बी.पाटील यांनी दिला.
हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर यांनी सांगितले, या रस्त्याची गेल्या ६ महिन्यांत पार दुर्दशा झाली आहे. खराब रस्ते अपघातांना निमंत्रण देतात. सरकारकडून जमा होणारा निधी नेमका कसा खर्च होणार, हा जनतेचा प्रश्न आहे. दिवाळीपर्यंत रस्त्याची डागडुजी न केल्यास जनतेच्या नाराजीला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.
बेळगावातील हिंडलगा गांधी चौक ते बाची या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तथा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सरकारने तात्काळ जागे व्हावे, यासाठी अभिनव आंदोलन हाती घेण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
बाची लिंक रोडची गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्दशा झाली आहे. ७ ते ८ ग्रामपंचायतींनी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली पण उपयोग झाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन तपासणी केली. मात्र आतापर्यंत केवळ दुरूस्तीही हाती घेण्यात आलेली नाही. खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे दररोज अपघात होत आहेत. सरकारच्या दुर्लक्षित वृत्तीचा हा अंतिम निषेध असल्याचा इशारा आर.एम. चौगुले यांनी दिला. या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments