खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील लक्केबैल कृषी पतीन सहकारी संघाचे सचिव, प्रकाश पांडुरंग पाटील (वय 47, रा. लोकोळी, ता. खानापूर) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. प्रकाश पाटील हे गेल्या 22 वर्षांपासून या संघात सचिव म्हणून कार्यरत होते.

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास, संस्थेच्या कार्यालयात त्यांनी कीटकनाशक औषध प्राशन केले.  ही बाब काही वेळानंतर इतरांच्या लक्षात येताच, ताबडतोब त्यांना खानापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बेळगाव येथे पाठविण्यात आले होते. परंतु उपचाराचा काहीही उपयोग न होता. त्यांचे आज निधन झाले असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत खानापूर पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

प्रकाश पाटील हे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सचिव म्हणून ओळखले जात होते आणि संस्थेच्या प्रगतीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. संस्थेच्या व्यवहारातील तक्रारी व मागील वर्षी झालेल्या नव्या कमिटीमुळे वाढलेल्या अंतर्गत वादांमुळे त्यांच्यावर ताण होता. या सोबतच, काही कौटुंबिक अडचणी देखील त्यांच्या जीवनात होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढत गेला.

प्रकाश पाटील यांनी आपली व्यथा कोणालाही बोलून न दाखवता सोसायटीच्या कार्यालयात आत्महत्या केली, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे लोकोळी-लक्केबैल परिसर आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.