• बुडाच्या बैठकीत निर्णय 

बेळगाव / प्रतिनिधी 

सिंगल ले - आऊट आणि विक्रीनंतर प्रलंबित विकासासाठी बांधकामाचा प्रश्न सोडविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाच्या (बुडा) बैठकीत घेण्यात आला.

सदर बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बुडा अंतर्गत अस्तित्वात असलेल्या कणबर्गी रामतीर्थनगरमध्ये गेल्या २७ वर्षांपासून न दिसलेल्या विकासावर चर्चा करण्यात आली. बुडा अनुदानांतर्गत थकबाकी असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करून त्या महापालिकेकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच यासाठी बुडा व महापालिका यांनी लवकरच संयुक्त सर्वेक्षण करावे, अशी सूचना करण्यात आली.

शहरात वाढणाऱ्या सिंगल ले - आऊटमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. एकच ले-आऊट उभारल्यानंतर पायाभूत सुविधा उपलब्ध नसताना त्याची जबाबदारी नगरसेवकांवर न टाकता ले-आऊट उभारतानाच खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, दक्षिणचे आमदार अभय पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बुडा आयुक्त शकील अहमद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, नगरसेवक व बुडा नामनिर्देशित सदस्य हणमंत कोंगाळी, महापालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर, बुडा संचालक बुडा व महापालिका अधिकारी उपस्थित होते.