• कणकुंबी प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 
(मराठी शाळा कणकुंबी येथे पालक व माजी विद्यार्थी
 यांना मार्गदर्शन करताना श्री. अनिल देसाई) 

खानापूर / प्रतिनिधी  

आपल्या मातृभाषेच्या शाळा टिकविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम करण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करावी या उद्देशाने मातृभाषा व सरकारी शाळा वाचविण्या व टिकविण्याबाबतच्या अभिनयांतर्गत जनजागृतीसाठी येत्या दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता शिवस्मारक खानापूर येथे विश्वभारती कला क्रीडा संघटना उपशाखा खानापूर यांच्यावतीने भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन  विश्वभारती कला क्रीडा संघटनेद्वारे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक श्री.अनिल सताप्पा देसाई यांनी केले.  

कणकुंबी शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन  करताना ते बोलत होते. यावेळी शिक्षण, खेळ, कला - क्रीडा व  विविध स्पर्धांच्या आवडीप्रमाणे सर्व सरकारी शाळा वाचविण्या आणि टिकविण्यासाठी त्यांनी जनजागृती केली. 

(कणकुंबी मराठी शाळेतर्फे श्री. अनिल देसाई यांचा सत्कार) 

याप्रसंगी मराठी शाळा कणकुंबी मार्फत अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्याला शिक्षक - शिक्षिका, शाळा सुधारणा समिती अध्यक्ष - उपाध्यक्षांसह सर्व सदस्य पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. 

  • कालमणी शाळेलाही दिली भेट :


कणकुंबीतील मेळाव्यानंतर श्री.अनिल देसाईं यांनी जांबोटी (ता. खानापूर) भागातील कालमणी गावच्या शाळेला भेट दिली. यावेळी शिक्षक - पालक शिक्षणप्रेमी आणि एसडीएमसी अध्यक्ष तसेच ग्रामस्थांना भेटून त्यांनी विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे उद्दिष्ट सांगितले.