• बस चालकासह ६ प्रवासी जखमी  

बैलहोंगल / वार्ताहर  

केएसआरटीसी परिवहनची बस आणि सोयाबीन काढणी मशिनची समोरसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चालकासह ६ प्रवासी जखमी झाले. धारवाड - बैलहोंगल मार्गावर मलप्रभा नदीजवळ बुधवार (दि. २५ सप्टेंबर) रोजी दुपारी ही घटना घडली. अपघात झाला त्यावेळी बसमधून सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, मलप्रभा नदीच्या बाजूला असलेल्या एका शेतातील सोयाबीन काढून झाल्यानंतर सोयाबीन काढणी मशिन बैलहोंगलहून धारवाडच्या दिशेने जात होते. याचदरम्यान केएसआरटीसी परिवहनची बस धारवाडहून बैलहोंगलच्या दिशेने येत होती. यावेळी वळणाचा अंदाज न आल्याने  बसची सोयाबीन काढणी मशिनला धडक बसल्याने हा अपघात झाला. मात्र प्रसंगावधान राखून बस चालकाने बस उसाच्या शेतात वळविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

अपघातानंतर जखमी चालक आणि प्रवाशांना सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन गनिगेर आणि जालीकोप्प ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेद्वारे बैलहोंगल शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद बैलहोंगल पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.