बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे मंगळवारी रात्री श्री गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान मोठ्या वादात होऊन तिघा युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला. दर्शन पाटील, नितीश पुजारी आणि प्रवीण गुंड्यागोळ अशी चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. जखमींपैकी प्रवीण गुंड्यागोळ या तरुणावर खासगी रुग्णालयात तर दर्शन पाटील आणि सतीश पुजारी यांच्यावर बिम्समध्ये उपचार सुरू आहेत. सदर विद्यार्थी हे वसतिगृहातील असून त्यांच्या पोटावर, मानेवर व पाठीवर वार करण्यात आले आहेत. बेळगावातील चर्च गल्लीतील तरुणांच्या टोळीने हे कृत्य केल्याची चर्चा सुरू आहे.   

हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन आरोपींना एपीएमसी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वनाथ कब्बूर आणि कर्मचाऱ्यांनी  विश्वेश्वरय्या नगर येथे अटक केली. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरु आहे. या घटनेची नोंद एपीएमसी पोलीस स्थानकात झाली असून  पोलिस अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन पुढील तपास सुरु केला आहे.