- टीम इंडिया विजयापासून 6 विकेट्स दूर
- बांग्लादेशला आणखी ३५७ धावांची गरज
चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला. अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. बांग्लादेशने दुसऱ्या डावात ३७.२ ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून १५८ धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी आणखी ३५७ धावांची गरज आहे. तर टीम इंडिया विजयापासून फक्त ४ विकेट्स दूर आहे. टीम इंडियाकडे पहिल्या डावातील २२७ धावांची आघाडी होती. तर भारताने दुसरा डाव ४ बाद २७८ धावांवर घोषित केला. त्यामुळे बांगलादेशला ५१५ धावांचे आव्हान मिळाले.
- टीम इंडियाचा दुसरा डाव :
दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि ऋषभ पंत या जोडीने चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. पंत आणि शुबमन या दोघांनी वैयक्तिक शतकी खेळी केली. पंतने १०९ धावांचे योगदान दिले. तर डाव घोषित केला तेव्हा शुबमन ११९ आणि केएल राहुल २२ धावांवर नाबद परतले. तर त्याआधी दुसऱ्या दिवशी रोहित, यशस्वी आणि विराट या तिघांनी अनुक्रमे ५, १० आणि १७ अशा धावा केल्या होत्या. तिथून पंत आणि शुबमनने पूर्ण दिवस खेळून काढला आणि तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाला ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराज याने २ विकेट्स घेतल्या. तर तास्किन अहमद आणि नाहिद राणा या दोघांना १-१ विकेट मिळाली.
- बांग्लादेशसमोर ५१५ धावांचे आव्हान :
बांग्लादेशने ५१५ धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशला तिसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत ४ झटके देत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. यशस्वी जयस्वाल याने गलीमध्ये झाकीर हसन याचा अप्रतिम कॅच घेतला. झाकीरने ३३ धावा केल्या. त्यानंतर शादमन इस्लाम ३५ धावांवर झेलबाद झाला. मोमिनूल हक याने १३ धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर केएल राहुल याने मुश्फिकुर रहीम याचा १३ रन्सवर अप्रतिम असा कॅच घेतला. भारताकडून आर अश्विन याने ३ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने १ विकेट मिळवली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कॅप्टन नजमूल हुसेन शांतो ५१ आणि शाकिब अल हसन ५ धावांवर नाबाद परतले. बांग्लादेशने ३७.२ ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून १५८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याआधी दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने बांग्लादेशला १५० धावांच्या आत रोखण्यात यश मिळवले. भारताने पहिल्या डावात केलेल्या ३७६ च्या प्रत्त्युतरात बांग्लादेशला १४९ धावा करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला २२७ धावांची आघाडी मिळाली. आता चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा बांग्लादेशला पहिल्याच सत्रात गुंडाळून विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
0 Comments