• सकाळी घरगुती तर सायंकाळी सार्वजनिक गणेशमूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना 
  • बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण

बेळगाव / प्रतिनिधी 

"गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा" जयघोष , पारंपरिक वाद्यांचा गजर अन् फटाक्यांच्या अतिषबाजीत बेळगाव तालुक्यासह शहरात विघ्नहर्त्या गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मंगलमय वातावरणात सकाळी घरगुती तर सायंकाळी सार्वजनिक श्री गणेश मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 




तत्पूर्वी सकाळपासूनच तालुक्यासह शहर - परिसरात नागरिकांची गणेशमूर्ती आणण्यासाठी लगबग दिसून आली. परिणामी शहरातील समादेवी गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, टिळकवाडी, शहापूर-वडगांव यासह शहराच्या विविध भागात गणेशमूर्ती नेण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी पाच फळे आणि पूजा साहित्याचीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुले - हार आणि फळांचे दर वाढल्याचे दिसून आले. 

सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात जल्लोषी स्वागत केले. यानंतर घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना आणि शास्त्रोक्त पुजा-अर्चा केल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सर्वांनी बाप्पाच्या साक्षीने स्नेहभोजन केले. 

  • सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन अन् प्रतिष्ठापना 

बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात मुंबई आणि पुणे शहराप्रमाणे आगमन सोहळे आयोजित केले जात आहेत. त्या अनुषंगाने शहर आणि तालुक्यातील ठराविक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश चतुर्थी पूर्वीचं दोन ते तीन दिवस आपल्या मंडळाच्या श्री मूर्ती नियोजित मंडपस्थळी नेल्या होत्या. मात्र  शहर व ग्रामीण भागातील इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सायंकाळी तीन नंतर गणेश मूर्ती नेण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. त्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. भाविकांची होणारे गर्दी लक्षात घेऊन शहर ग्रामीण व पोलीस स्थानकातर्फे सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींचे मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली.

एकंदरीत बाप्पाच्या आगमनाने बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.