बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावात ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान कोणताही त्रास होऊ नये यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना पूर्वतयारी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बेळगावातील ऐतिहासिक श्री गणेशोत्सवाला अवघे सहा दिवस शिल्लक असताना बेळगाव जिल्हा प्रशासन गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विभागीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

यावेळी गणेशोत्सव मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी. पथदिवे लावावेत. मिरवणूक मार्गांवर फिरत्या स्वच्छतागृहांसह आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरात विविध ठिकाणी लोंबकळणाऱ्या विद्युत तारा हटविण्यासाठी हेस्कॉम तसेच दूरसंचार विभागाने कारवाई करावी, मिरवणुकीदरम्यान आरोग्य विभागाने लोकांच्या सोयीसाठी आवश्यकतेनुसार प्रथमोपचार यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, खडेबाजार, मारुती गल्ली, कपिलेश्वर रोड या मिरवणूक मार्गांसोबत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात याव्यात, मिरवणूक मार्गावर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी पूर्वसिद्धता करण्यासाठी सर्वेक्षण करून दोन दिवसांत अहवाल द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विभागानेही कार्यक्षम राहून अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखाव्यात. शहरात बांधण्यात आलेले रस्ते विकास कामाच्या वेळी खोदले जात असून काम पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत आहेत. खोदलेल्या रस्त्याची योग्य देखभाल न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

या बैठकीत शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, डीसीपी रोहान जगदीश, महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, डीएचओ महेश कोणी, महानगरपालिका, पोलीस, हेस्कॉम, दूरसंचार, वनविभाग अधिकारी सहभागी झाले होते.