बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्यातील नावगे क्रॉस येथील स्नेहम टेपिंग अँड सोल्युशन या टिक्सो टेप (ॲडहेसिव्ह टेप) बनविणाऱ्या कारखान्याला मंगळवारी रात्री भीषण आग लागली.

स्नेहम टेप मॅन्युफॅक्चर कारखान्याच्या लिफ्टमध्ये शॉर्ट सर्किट होऊन संपूर्ण कारखान्यात आग पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या शिफ्टमधून बाहेर पडताना इन्सुलेशन तयार असलेल्या कारखान्यात आग लागली. आग लागताच कामगार बाहेर धावले. या घटनेत मार्कंडेयनगर येथील यल्लाप्पा गुंड्यागोळ (वय १८) या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला असून मारुती कारेकर (वय ३२), यल्लाप्पा सालगुडे (वय ३५) आणि रणजित पाटील (वय ३९) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 

या दुर्घटनेत लिफ्टमध्ये अडकून आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या तरुणाचा मृतदेह एसडीआरएफ टीम आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला. दरम्यान तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसेच अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांसह अनेक जवान तब्बल १२ तासांहून अधिक काळ आग विझवण्यात व्यस्त होते. कारखान्याच्या आजूबाजूला घरे आहेत मात्र या भागातील लोकांना काळजी करण्याची गरज नाही. कारखान्यात गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याची शक्यता नसल्याची पुष्टी तज्ज्ञांनी केली आहे. 

आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, उपायुक्त रोहन जगदीश, सहाय्यक पोलीस आयुक्त,पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला होता. या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.