बेळगाव / प्रतिनिधी 

आम्ही बेळगाव महापालिकेला कर भरतो. मात्र, आम्ही बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत की अन्य भागात राहात आहोत, असा प्रश्न बेळगाव टिळकवाडी आणि मंडोळी रस्त्यालगत असलेल्या वीरसावरकर कॉलनीतील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.  

वीस ते पंचवीस  वर्षांपूर्वी बेळगाव टिळकवाडी, मंडोळी रोडला लागून असलेल्या वीरसावरकर कॉलनीत घरे बांधलेले रहिवासी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. येथील नागरिक महापालिकेला कर भरतात. पण  येथे पथदीप, रस्ता, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव आहे.  तसेच महापालिकेचे  कचऱ्याची उचल करणारे वाहनही तिथे जात नाही. लहान मुले व वृद्धांना याचा मोठा त्रास होत आहे. बसची व्यवस्थाही नाही. खराब कच्च्या रस्त्यावरून वाहने चालवणेही अवघड झाले आहे. संबंधितांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी वीर सावराकर कॉलनीतील महिलांनी केली.

पावसात वीर सावरकर कॉलनीची दुर्दशा झाली आहे. बेळगावला स्मार्टसिटीचा किताब मिळाला आहे. पण स्मार्टसिटीमध्ये आमची कॉलनी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील रस्त्यावरून लहान मुले व महिलांना, जवळच्या वृद्धाश्रमातील सदस्यांनाही चालता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी वीर सावरकर कॉलनीतील रहिवासी प्रभाकर गुंजी यांनी केली.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी टिळकवाडी, मंडोळी रोडला लागून असलेल्या वीरसावरकर कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते.