बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील बकानूर गावात रस्त्यावर झाडे लावून कर्नाटक राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील बाकनूर गावात अनेक समस्या असून, प्रामुख्याने येथील रस्ते पूर्णत: खराब झाले असून,बाकनूर क्रॉसपासून साडेपाच किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी रस्त्यावर झाडे लावून कर्नाटक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा निषेध केला.
याप्रसंगी बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, बकानूर क्रॉसपासून सुमारे साडेपाच किलोमीटरच्या संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली असून, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून विकासकामे करत नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. बसेस योग्य वेळी धावत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाता येत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. या गावात आरोग्य केंद्र असून डॉक्टर हजर नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. हे सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे. वाल्मिकी निगम घोटाळा, मराठा विकास महामंडळाची लूटमार, मुडा घोटाळा, एससी-एसटी समाजाचा पैसा आणखी कशासाठी वापरला गेला, यावरून कर्नाटकचे काँग्रेस सरकार दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.
बकानूर गावातील एका विद्यार्थ्याने बोलताना रस्ता खराब झाल्यामुळे गावात बस नीट येत नसल्यामुळे शाळेत जाता येत नसल्याची खंत व्यक्त केली. या आंदोलनात प्रल्हाद गुरव, दीपक नाईक, निंगू गावडे , गोपाळ पाटील, संभाजी नाईक, ग्रामपंचायत सदस्य मालू माळूकर, गावातील महिला, विद्यार्थी व युवक उपस्थित होते.
0 Comments