• टेंगिनकेरा गल्ली राजगुरू युवक मंडळाचा पुढाकार 
  • कामत गल्ली स्मशानभूमीत राबवली मोहिम 

बेळगाव : टेंगिनकेरा गल्ली येथील राजगुरू युवक मंडळाच्यावतीने  जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयानजीक असलेल्या कामत गल्ली विभाग स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

गेली कित्येक वर्षे दुर्लक्ष झाल्याने स्मशानभूमी येथे अस्वच्छता पसरली होती. यामुळे अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना पायधुण्यासाठी एकच पाण्याचा नळ होता. मात्र तोही चारीबाजूने मोडकळीस आला होता.

त्यामधून सातत्याने पाण्याची गळती होऊन स्मशानभूमीत सर्वत्र चिखल पसरला होता. याची दखल घेत राजगुरू युवक मंडळाच्या युवकांनी गेले आठ दिवस रोज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत व रविवार पूर्ण दिवस स्वच्छता मोहिम राबविली. अंत्यसंस्कार केल्यानंतर फेकण्यात आलेला कचरा, साहित्य एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

तसेच एक हजार लिटरची पाण्याची टाकी बसवून त्याला चार नळ जोडून अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांसाठी हात - पाय धुण्यासाठी सोय करण्यात आली. वाढलेली रानझुडपे काढून तिथे विविध प्रकाराच्या २०० हून आधिक रोपांची लागवड करण्यात आली. याशिवाय स्मशानभूमीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी काँक्रिट घालण्यात आले.  

या स्वच्छता मोहिमेत मारुती निलजकर, भरत देवजी, विशाल ताशिलदार, मल्लिकार्जुन बेलापगोळ, अविनाश पिसे, अलोक सुर्यवंशी, प्रविण काळे, राजु शेडगे, बाळू राणे यांच्यासह इतर युवक सहभागी झाले होते.