•  रवळु महाराज चौगुले - लक्ष्मण कणबरकर यांच्या नेतृत्त्वाखाली ९ वर्षांची परंपरा 

फोटो सौजन्य : श्री. कृष्णा कणबरकर
सिद्धकला फोटो स्टुडिओ ;सुळगा (उ.)

सुळगा (उ.) / वार्ताहर 

येत्या (१७ जुलै) रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश गावांच्या वारकरी दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. 

दरम्यान बुधवार (दि. ३) जुलै रोजी सुळगा (उ.) (ता. बेळगाव) येथील वारकऱ्यांच्या पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. प्रारंभी सकाळी जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत गावातील विठ्ठल - रूक्मिणी मंदिरात पूजन करून या दिंडीला चालना देण्यात आली. 



यानंतर पुंडलिक....वरदे हरी... विठ्ठल...। श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय....असा जयघोष करत डोक्यावर तुळशी घेतलेल्या महिलांसह टाळ मृदंगाच्या गजरात पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. 

गेल्या ९ वर्षांपासून बेळगाव तालुक्याच्या सुळगा (उ.) गावातील वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडी काढत आहेत. रवळु महाराज चौगुले आणि लक्ष्मण कणबरकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या वारकरी दिंडीत सुरुवातीला केवळ ७० ते ८० वारकऱ्यांचा सहभाग होता. मात्र यावेळी २०० ते २५० हून अधिक जण पंढरपूरला जात आहेत. या दिंडीमध्ये महिला, लहान मुले, तरुण, वृद्ध आदींचा सहभाग आहे. दर दिवशी २५ किमी प्रमाणे १० ठिकाणी विश्रांती घेत ही पायी दिंडी पंढरपूरला पोहोचते, अशी माहिती विठ्ठल कणबरकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.