बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पिरनवाडी नगरपंचायत अंतर्गत ४० हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले असून, लोकांचे हाल होत आहेत. नगरपंचायतीकडून जनतेच्या समस्या सोडवण्याकडे तीव्र दुर्लक्ष झाले असून, नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांनी, नगरपंचायतीला घेराव घालून लोकांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणी नसल्याचा निषेध केला.

बेळगाव जिल्ह्यातील पिरनवाडी येथील मारुती गल्लीतील ४५ हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील पाणी काढण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. मात्र पावसाचा जोर काही कमी झालेला नाही. या भागातील नागरिकांची पावसाचे पाणी घराबाहेर काढण्याची लगबग सुरु घरांमध्ये पाण्याने ३ फुटांपेक्षा जास्त उंची गाठली आहे. पिरनवाडीतील लोकांमध्ये डेंग्यू मलेरियाची चिंता वाढली आहे. पिरनवाडीजवळचा कालवा ओसंडून वाहून गेल्याने घरांमध्ये पाणी शिरले आहे. फर्निचर, रेफ्रिजरेटर, कपाट, भांडी, पलंग यासह घरातील सर्व साहित्य पाण्यात बुडाले. त्यामुळे नागरिक अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत आहेत.