• बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आ.अभय पाटील यांचा इशारा 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील विकासामुळे खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास जनता स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांनावेठीस धरतील, असे दक्षिण आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

बेळगावात मालमत्ता करात लाखो रूपयांनी वाढ होत असून, यात काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सीओडीची चौकशी करावी, अशी मागणी आमदार अभय पाटील यांनी केली. बेळगाव महापालिकेत आज महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. यावेळी दक्षिणचे आमदार अभय पाटील म्हणाले की, बेळगावातील काही नागरिकांच्या मालमत्ता करात लाखो रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय असून नागरिक त्यांच्याकडे तक्रारी करत आहेत. मनपाच्या कार्यालयातील संगणक चोरणारे कोण? ही गंभीर बाब असून सीओडीच्या चौकशीची मागणी केली.

स्मार्टसिटीचे अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचे योग्य नियोजन केलेले नाही. स्मार्टसिटी अंतर्गत रस्त्यांचा विकास केला जात आहे. मात्र त्यानंतर गॅस पाईपलाईन किंवा अन्य कामांसाठी खोदलेले रस्ते किमान ३ महिने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा नागरिक एलअँडटी अधिकाऱ्यांना  वेठीस धरणार असल्याचा इशारा आमदार अभय पाटील यांनी दिला.

 या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇

बेळगाव शहराचा विकास करण्यासाठी स्मार्टसिटीला आणखी १३५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, त्याचा सदुपयोग करून शहराचा अधिक विकास करा, असा सल्लाही त्यांनी दिला. शहरात भूमिगत (यूजी) केबल असतानाही खासगी कंपन्यांच्या केबल्स ठिकठिकाणी लटकतअसल्याबाबत आमदारांनी बैठकीत चर्चा केली. यावेळी आमदार अभय पाटील यांनी खासगी केबल कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. केबल टाकण्यापूर्वी परवानगी न घेतल्यास कनेक्शन तोडून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

या बैठकीत मालमत्ता कर, पेट्रोल पंप निविदा, निवडणुकीच्या काळात कौन्सिल सदस्याच्या खोल्यांना कुलूप यासह इतर विषयांवर चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. यावेळी बेळगाव उत्तरचे  आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, नगरसेवक, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇